Monday, April 07, 2008

कॅराव्हॅजिओ.
मायकेलअँजेलो मेरिसी दा कॅराव्हॅजिओ:
सोळाव्या शतकातला इतालियन चित्रकार.
ART101 पासूनच याच्या बरोक शैलीतल्या चित्रांनी भुरळ घातली होती. 'चिआरोस्क्युरो': प्रकाश-छायेचा खेळ चित्रित करायचं तंत्र म्हणजे काय ते सांगताना सात्यकी सरांनी याचीच तर चित्रं उलगडून दाखवली होती. मागच्या सुट्टीत सुदर्शन रंगमंचावर 'बीबीसी'ची 'पॉवर ऑफ आर्ट' मालिका दाखवत होते. रेम्ब्रां, टर्नर, रॉथको, पिकासो, बर्निनी..सगळे सोडून माझ्या वाट्याला आला तो हा - कॅराव्हॅजिओ. त्याच्या चित्रांसारखंच अतिशय अस्वस्थ करणारं, वादळी जगणं त्याचं. जसा आवेगात चित्रं रंगवेल, तसा आवेगात जगणं उपभोगेल. कुंचल्याइतक्याच इमानदारीत तलवार चालवेल. ही रानातल्या झर्‍याची खळखळ नव्हती. डोंगराच्या चिरल्या छाताडातून उन्मत्तपणे कोसळणारा विराट धबधबा होता तो! त्याच्या जगण्याचं ते चित्रीकरण नादावणारं होतंच..पण त्याचा शेवट फार चटका लावणारा होता. धबधबा जमिनीवर उतरल्यावरची त्याची संथ, घायाळ शरण-गती नाहीच बघवत..
***

आणि आता सापडलेलं त्याचं हे चित्र.
काय आठवावं लगेच?
अर्थात्‌ ग्रेस.
'भय इथले..'.
दुसरं काही नाहीच.
चित्राला 'जॉन द बॅप्टिस्ट' नाव दिलं म्हणजे ते चित्र जॉनचं होत नाही.
तू स्वत: त्या चित्राशी किती एकजीव झालाहेस, आम्हांला काय कळत नाही का बेट्या?
तू चित्रातून सांगितलंस. आमच्या कवीनं शब्दांतून सांगितलं. उगीच काही उणीव नको राहायला, म्हणून सोबतीला रविशंकरांचा पूरिया धनाश्री.
नवीन शकाची पहिली सांजवेळ ही अशी आकुळतिकुळ. दारी नसलेल्या कडुनिंबाची सय कशाला काढू?

***
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

आकसून इवलासा झालेला चेहरा. आता रडू फुटतंय की काय अशा भीतीने मुडपून गच्च दाबून घेतलेले ओठ. तू नाहीस म्हणून अगतिकता, आणि कुण्या अज्ञातावरचा किंचित हताश संताप भुवईवर, नाकाच्या शेंड्यावर. तिन्हींकडून दाटत आलेला अंधार - माझ्या काठीसकट गिळणार मला आता. उलट्या पायाच्या भुतासारखं पाठीमागच्या अंधाराचं प्रतिरूप पुढे माझ्या चेहर्‍यावर. खूप भीती वाटतेय गं, खूप! एक भीती अतिभयानक असते: आपल्याला कुणी भित्रा म्हणेल याची भीती. तुला ठाऊक आहे कसा एकटाऽच आळवत बसतो तुझी-माझी गाणी? तुला..फक्त तुलाच ठाऊक असायला हवं.

हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

सजवणारा चंद्र. जळजळीत किरणांना इथे शांतवणारे झरे बनवून पाठवणारा.
आठवतं, संध्याकाळचा तांबडा आवेग नकळत शांत होत जायचा. सावल्यांनी रान वेढत जायचं, आणि ढगांची भगवी किनार तशीच जमिनीवर ओठंगून. जमीन अजूनही निखार्‌यांनी फुलतेय असं वाटतंय तोवर तिच्यात तेवणारी ज्योत दिसायला लागायची. आतडं तोडणार्‍या अपार मायेचा रंग भगवाच. ती जमीन अशी कुशीत घ्यायची तेव्हा वाटायचं, असेच तिच्यात रुजून जाऊयात आपण. या आसपासच्या अनाघ्रात झाडांसारखे वर येऊयात मग: ताठ, समर्थ, सुंदर, अजरामर, सतत..सोबत.


त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‌याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

'आपण कधीच असे वेडे नाही होणार'. मी ठासून बजावलं होतं स्वत:ला. का आलीस अशी सावरीच्या गिरक्यांनी?
तुझं भोळेपण - मला अजून ठरवता येत नाही, उपजत की स्वीकारलेलं ते - आणि माझ्या स्नायूंमध्ये अपरिचित थैमान. अप्राप्य क्षितिज असं लाटांवर सवार होऊन जवळ आल्यासारखं वाटलेलं क्षणभर..

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणुं अंगी राघव शेला

झोपलेल्या बाळाशी आईने हितगुज करावं तसं तुझं बोलणं. एका सहज स्पर्शाने उभी सतार झिणझिणते तसं माझं सारं अस्तित्व तुझ्या शब्दांबरोबर चालतं आहे..कसनुसं. काय गंमत आहे बघ. नि:संग होऊन इथे यायचं म्हटलं तर तू दिलंस ते वैराग्याचं कषायवस्त्र. चौदा वर्षांच्या वनवासात राम सोबत होता. नव्हता तेव्हाही 'तो आहे, तो येईल' हा दिलासा होता. नंतरचा वनवास मात्र त्याच्याच इच्छेनं घडलेला. 'तो नाही'. बस्स! ते एकच सत्य. तो शेला त्याचं प्रतीक? बहर ओसरल्यावरचं उरलेलं चिवट पान? की फक्त 'तो कधीतरी होता'च्या आठवणींचा न विरणारा अथांग उबदार पट?

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

'नात्यांचे भग्नावशेष'. कधीतरी कुठेतरी वाचलेले शब्द असे जगणं बनून सामोरे येतात तेव्हा रडायला येतं अगं. तुलापण? ओंजळीआडून, हमसून हमसून?
कैलास लेणं एकत्र बघायचं होतं आपल्याला. एका अखंड कातळात कोरलेलं..एकसंध. मला किती आकर्षण त्या अभंगतेचं. चुकून वाटलं तुला पण...
असा पायाविना कळस का झाला गं आपल्यात ?


संध्येतील कमल फुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तुझ्या नावाने घेतलेलं आचमन. तुझ्याच नावाच्या समिधा आता. रमा ठाऊकाय ना? सती जाण्यापूर्वी सजलेली?
हे कातडीचं आवरण अजून तितकंच ताणलेलं आहे, म्हणूनच की काय कोण जाणे माझा आक्रोश इतका भेदक वाटतोय. दु:खाचा रंग निळा असतो म्हणे. ठार निळ्या रात्रीत मला कवळणारी ही ठार निळी झाडं. मला तुमच्यात रुतवून घ्या रे, मित्रांनो!

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

आहेत, रानं प्रेमळ आहेत. धरणी माझी आई, निसर्ग माझा बाप. काय काय सांगत राहतात मला. शिकवत राहतात. तुला कालव माहिती आहे? शिंपल्यात असतं ते? त्याला की नाही, वाळूचा कण रुपतो. खुपतो. त्रास देतो. त्या कचकच्या कणावर मग चांदण्याचे लेप. सुघड मोत्यासारख्या आठवणीचा गाभा असा दु:खाचा?

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

चहूंकडे धूसर होत चाललं होतं, की माझ्याच पापण्या डबडबल्या होत्या? मी परत फिरलो की मला परत फिरावं लागलं? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नको आहेत. मला मुळात हे प्रश्नच नको आहेत. आपल्या अस्तित्त्वाची एकही खूण मागे न ठेवता विरून जाणार्‌या उदकफुलासारखी निघून जाशील?